Sunday, 30 April 2023

वारणेचा प्रसिद्ध तह नक्की काय होता?


वारणेचा प्रसिद्ध तह नक्की काय होता?

सन १७०० साली शिवपुत्र छत्रपती राजाराम महाराजांचे निधन झाल्यानंतर पुढे सात वर्षे महाराणी ताराबाईंनी औरंगजेबाशी लढा दिला. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर शंभूपुत्र शाहू मुघलांच्या कैदेतून सुटून आले व त्यांनी गादीवर आपला हक्क सांगितला. यातून वाद निर्माण होऊन १७०७ ते १७१० या काळात स्वराज्याच्या सातारा व कोल्हापूर या दोन गाद्या निर्माण झाल्या. या दोन्ही गाद्यांमध्ये श्रेष्ठत्वासाठी नेहमी लढाया व्हायच्या. मात्र सन १७३१ साली सातारचे छत्रपती शाहू महाराज यांनी पुढाकार घेऊन आपले बंधू कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे (दुसरे) यांच्याशी तह केला. हाच तो इतिहास प्रसिद्ध 'वारणेचा तह' होय.
त्यावेळी तह जखिणवाडी गावी झाला होता. वारणा नदी दोन्ही राज्याची सीमा बनली. त्यानंतर दोन गाद्या निर्माण झाल्या. एक सातारची गादी आणि दुसरी कोल्हापूरची गादी. तो ‘वारणेचा तह’ म्हणून प्रसिद्ध आहे.

तह 13 एप्रिल 1731 रोजी झाला. त्यांपैकी काही अटींचे पालन झाले तर काहींचे नाही. तहाची आठवण म्हणून शाहुराजांनी गावाला दोन तलवारी भेट दिल्या होत्या. त्या गावच्या मळाईदेवी मंदिरात आहेत.
या तहान्वये दोन्ही छत्रपतींनी दोघांचाही दर्जा समान असल्याचे मान्य केले व आपल्या राज्यांच्या सीमा ठरविल्या. यामुळे छत्रपती घराण्यातील भाऊबंदकी कायमस्वरुपी संपुष्टात आली. १७३१ नंतर कोल्हापूर व सातारा छत्रपतींदरम्यान एकही लढाई झाल्याचा किंवा वैमनस्य उद्भवल्याचे उदाहरण इतिहासात नाही. उलट दोन्ही छत्रपती नेहमी एकमेकांकडे रहायला जात असल्याची अनेक उदाहरणे पहायला मिळतात. दोन्ही छत्रपतींच्या बंधुत्वाचे व सलोख्याचेही अनेक पुरावे इतिहासात मिळतात.
पुढे पेशव्यांनी दोन्ही गाद्या एकत्र करण्यासाठी खूप प्रयत्न केले पण त्यात यश आले नाही.

वारणेच्या तहानंतर सातारच्या छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूर राज्याची वारंवार काळजी घेतली होती. कोल्हापूर राज्याविरुद्ध कुणी सरदार काही हालचाली करत असेल तर त्यास शाहू महाराजांनी खडसावलेली पत्रे आजही आपल्याला पहायला मिळतात. शाहू महाराजांच्या अत्यंत लाडक्या बाजीराव पेशव्याने जेव्हा कोल्हापूर राज्याची काही गावे लुटली तेव्हा त्यांची कानउघाडणी करण्यासही शाहू महाराजांनी कमी केले नाही. उलट ते म्हणायचे की "आमच्या बंधूंशी (कोल्हापूरच्या छत्रपतींशी) युद्ध म्हणजे खुद्द आमच्याशी युद्ध". या वाक्यातच कोल्हापूर - सातारा छत्रपतींच्या संबंधाचे सार सामावले आहे.
आजही दोन्ही घराण्यातील विद्यमान वंशजांना एकमेकांप्रति आदरभाव आहे.

संदर्भ : करवीर रियासत

No comments:

Post a Comment