Tuesday, 11 April 2023

वटवाघुळ उलटे का लटकतात?

वटवाघूळ झाडाला उलटी का लटकतात?

बॅटमॅन या काल्पनिक कार्टून पात्रामुळे एका नकोशा वाटणाऱ्या प्राण्याला मोठं महत्त्व मिळालं आहे असं म्हणायला हरकत नाही. 
होय, वटवाघूळ हाच तो प्राणी. 
वटवाघूळ म्हटलं की किर्र काळोख, उजाड, पडीक आणि भयानक महाल, राजवाडे, भुयारं अशाच गोष्टी सर्वप्रथम आठवतात.

वटवाघुळांच्या या खास गोष्टींच्या बरोबरीने आणखी एक गोष्ट अगदी हमखास मनात येते, ती म्हणजे वटवाघुळांचं उलटं लटकणं. ही वटवाघुळं नेमकी का उलटी लटकतात, आणि या उलट्या लटकण्याच्या बरोबरीनेच आणखी कुठल्या गमतीशीर बाबी आज जाणून घेऊया.
रात्रपाळीवर निघतात बाहेर…

अवघं जग आराम करण्यासाठी घराकडे परतत असताना वटवाघुळांचा ‘दिवस’ सुरु होतो असं म्हणायला हवं. चहूबाजूंनी फेरफटका मारणं, अन्नपाण्यासाठी कीटकांवर ताव मारणं, झाडांवर फिरणं असा त्यांचा ‘रात्रक्रम’ असतो. रात्रभर ही अशी भटकंती करून झाली, की दिवसा वटवाघुळं झोपायला घरी परततात. त्यांची ही झोप म्हणजे उलटं लटकणं.
उलटं लटकून राहतात कारण…

अशाच वेगवेगळ्या ठिकाणांवर उलटं लटकून राहण्याची वटवाघूळांना फार आवड असते. मात्र त्यांचं हे असं उलटं लटकून राहणं ही त्यांची गरज सुद्धा असते. पक्षी ज्या पद्धतीने पंखांची विशिष्ट हालचाल करून जमिनीपासून वर उडण्यासाठी जोर निर्माण करतात, त्यापद्धतीने वटवाघुळे करू शकत नाहीत.

अशावेळी दुसरा पर्याय हा ठरू शकतो की लांबून धावत येऊन एक विशिष्ट वेग प्राप्त करून मग झेप घेणं. मात्र वटवाघुळांचे पायही काहीसे लहान आणि दुबळे असतात. त्यामुळे अशी झेप घेणं सुद्धा त्यांना सहज शक्य नसतं. अशावेळी उलटं लटकून राहणं आणि उडायचं असेल, त्यावेळी शरीर हवेत सोडून देणं आणि उडायला सुरुवात करणं हाच उत्तम पर्याय ठरतो. आपल्या लहानशा पायांनी उंचीवर चढून राहून वटवाघळं उलटी लटकून राहतात.
हा देखील फायदा

वटवाघुळं दिवसा झोपतात. म्हणजेच मनुष्यप्राण्यासह इतर अनेक प्राणी जे त्यांच्यासाठी धोकादायक ठरू शकतात, त्यांची कामाची वेळ ही वटवाघूळांची झोपण्याची वेळ असते. अशावेळी एखादं जीवावर बेतणारं संकट आल्यास, त्यातून स्वतःचा बचाव करायचा असेल, तर हे असं उलटं लटकून राहणं फायदेशीर ठरतं
त्यातही हंस कुणाचंही लक्ष वरच्या बाजूला पहिल्यांदा जात नाही. त्यामुळेच उलट्या लटकणाऱ्या या वटवाघुळांचा धोका मुळातच कमी झालेला असतो.

हे असं लटकून राहण्यासाठी त्यांनी निवडलेल्या जागा सुद्धा अशा असतात, की जिथे पक्षी आपली घरटी बांधण्याचा विचारही करणार नाहीत. त्यामुळेच मांसभक्षक पक्ष्यांकडून असणारा धोका सुद्धा आपोआप कमी होतो.

उलटं लटकण्याची खास कला

तुम्ही शीर्षासन किंवा बारवर उलटं लटकणं अशा गोष्टी कधी ना कधी केल्या असतील. अशावेळी थोड्याच वेळात काहीसं विचित्र वाटायला लागून खाली डोकं, वर पाय या स्थितीतून लवकर बाहेर पडावं अशी भावना मनात आली असेल. वटवाघुळं मात्र संपूर्ण दिवस ही अशीच लटकून असतात. ही गोष्ट ते कशी साध्य करत असतील? तर ही त्यांच्याकडील एक कला म्हणायला हवी.

मानवी शरीरात स्नायू आणि टेंडन्स हे एकमेकांशी जोडलेले असतात. वटवाघुळांचं मात्र तसं नसतं. त्यांचे टेंडन्स हे थेट शरीराच्या वरील भागाशी जोडलेले असतात. त्यामुळेच हे असं लटकून राहून सुद्धा स्नायू आणि रक्तप्रवाहावर कुठलाही परिणाम होत नाही.

No comments:

Post a Comment