जालियनवाला बाग...
सुवर्ण मंदिर दर्शन घेऊन पुढचा पॉईंट जालियनवाला बाग होता..
सहलीत या ठिकाणी जायचे आहे हे निश्चित झाल्यापासूनच मनाला हुरहूर लागली होती.
जो इतिहास आपण वाचला तो प्रत्यक्षात अनुभवायला बघायला मिळेल.
भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या अनेक कथा आहेत ज्या इतिहासाच्या पानात नोंदवल्या गेल्या आहेत. आजची पिढी जेव्हा त्या घटना ऐकते तेव्हा रक्त खळखळतं तर कधी त्यांची छाती अभिमानाने फुलून येते कधी डोळ्यातून अश्रू येतात तर कधी रागाने भरून येतात..
गुलाम भारताच्या इतिहासात अशी ही एक रक्तरंजित कथा आहे ज्यामध्ये ब्रिटिशांच्या अत्याचाराची आणि भारतीयांच्या हत्याकांडाची वेदनादायक घटना आहे. जालियनवाला बाग हत्याकांड प्रत्येक भारतीयांसाठी अत्यंत वेदनादायी घटना आहे .
ज्यामध्ये रक्ताच्या नद्या वाहत होत्या आणि मृत्यूचे हे दृश्य प्रत्येकाच्या आत्म्याला दुखावत होते.
अनेक निष्पाप निरपराध लोकांनी तेथे रक्त सांडले अशा बागेकडे जाताना मनात काहूर माजले होते. अरुंद रस्ता सभोवताली असलेली बंदिस्त भिंत आजही त्यातून निष्पाप निरपराध लोकांच्या वेदनांचा भास जाणवत होता.....
व डोळे नकळत पाणवल्यावाचून राहत नव्हते... आपण ज्या स्वतंत्र भारतामध्ये बिनधास्त श्वास घेतो त्याचे खूप मोठे मोल आपल्या पूर्वजांनी दिलेले आहे याची प्रत्येक भारतीयाच्या मनात जाणीव असली पाहिजे.
इतिहासात अशा अनेक तारखा आहेत ज्यामध्ये अनेक घटनांची नोंद आहे.
परंतु 13 एप्रिल चा दिवस कोणीही भारतीय विसरू शकत नाही.
हा दिवस देशाच्या स्वातंत्र्याच्या इतिहासात दुःखद घटनेने नोंदवला गेला आहे. ऐतिहासिक जालियनवाला बाग हे अमृतसरच्या प्रसिद्ध सुवर्ण मंदिराजवळ स्थित एक सार्वजनिक उद्यान आहे.
हे उद्यान 6.5 एकर जमिनीवर पसरलेले असून भारतातील एक दुःखद घटनेचा साक्षीदार आहे.
ब्रिटिश राजवटीत जनरल डायरच्या आदेशानुसार या ठिकाणी बैसाखी शांततेत साजरी करण्यासाठी जमलेल्या हजारो मुले वृद्ध तरुण व महिलांवर अंदाधुंद गोळीबार करण्याचे आदेश देण्यात आले. या घटनेत हजारो निष्पाप लोकांचा बळी गेला.
अनेक महिलांनी आपल्या मुलासह आपला जीव वाचवण्यासाठी विहिरीत उडी घेतली.
बाहेर पडण्याचा मार्ग अरुंद असल्याने चेंगराचेंगरीत अनेक लोक चिरडले गेले आणि हजारो लोकांना गोळ्या लागल्या.
या लोकांचे अतुलनीय धैर्य आणि बलिदान येणाऱ्या पिढींना प्रेरणा देत राहील हे नक्की..!
क्रमशः
✍️ सौ- वैशाली रवींद्र डोंबाळे
No comments:
Post a Comment