Tuesday, 23 May 2023

पेंग्विन हा खाल्ला का जात नाही?

पेंग्विन हा खाल्ला का जात नाही?

हा प्रश्न केवळ कुतुहल म्हणून विचारला गेला आहे असे मी समजतो.

सामान्यतः लोक कोंबडा, बदक, मोर, टर्की, शहामृग, काळी चिमणी, वटवाघूळ (विनोद केला..! 😜 तसेही वटवाघूळ पक्षी नसून सस्तन प्राणी आहे..!) वगैरे खातात मग पेंग्विन का नाही खात… अशी शंका येऊ शकते काही जणांना…

तर… पेंग्विन काहीसा असा दिसतो…
मूळ मुद्दा असा - पेंग्विन हा संरक्षित पक्षी आहे. त्यामुळे त्याला मारणे हा दंडनीय अपराध आहे.

तसेच पेंग्विन दक्षिण ध्रुव व त्याच्या आजूबाजूला असणारी बेटे व देश येथेच आढळतात. इतका दुर्मिळ हा पक्षी असल्यामुळे तेथेही त्याला खात नाहीत. तेथील लोक मासे किंवा इतर देशांतून आयात केलेले, साठवलेले कॅनबंद पदार्थ खाणे जास्त पसंद करतात.

पेंग्विनच्या शरीरामध्ये विषारी असे काही घटक नाहीत, की ज्यामुळे पेंग्विन खाल्ला जाऊ शकत नाही. पण त्यात असेही काही घटक अजूनही सापडले नाहीत, जेणेकरून पेंग्विन खाल्लामुळे मानवी शरीरास काही विशेष महत्त्वाचा असा फायदा होईल.

इतिहासात प्रथम पेंग्विन खाल्ल्याची नोंद इ. स. १४०० च्या आसपास मिळते. तेव्हा काही पोर्तुगीज खलाशांनी दक्षिण आफ्रिका येथील आफ्रिकन पेंग्विन खाल्ला होता. तसेच काही जुन्या दक्षिण ध्रुवीय मोहिमांत व दक्षिण समुद्रप्रवासांत, खायला काही शिल्लक नव्हते म्हणून जिवंत राहण्यासाठी पेंग्विन खाल्ल्याच्या काही नोंदी आहेत. कारण तेव्हा पेंग्विन कायदेशीर संरक्षित नव्हता..!

आता, पेंग्विन मारणे व खाणे हा तर अपराध आहे. मग त्यांची अंडी खाल्ली तर काय बिघडेल? याचेही उदाहरण इतिहासात सापडते. १९८० च्या आसपास आफ्रिकन पेंग्विनच्या अंड्यांची (अशा अंड्यांची व्यंजने परदेशी पाहुण्यांच्या जेवणात वाढण्यासाठी) दक्षिण आफ्रिकेत खूप मागणी होती. पण ही मागणी इतकी होती, की त्यामुळे तेव्हा आफ्रिकन पेंग्विनची सर्व प्रजातीच धोक्यात आली..! कारण उबवायला अंडीच राहिली नाहीत, तर पेंग्विनची पुढची पिढी तरी कशी येणार? अखेरीस तेथील सरकारने पेंग्विनची अंडी खाण्यावर विरोध (बॅन) लावला.

पण तरीही - कोण आहेत असे ज्यांना पेंग्विन खायचाय? किती सुंदर असतो तो..! काळा कोट घालून बर्फ तुडवित चालणारा "साहेबी पक्षी"च तो एक जणु..! जगू द्या त्याला.

तरीही जर रिस्क घेऊन पेंग्विन खायचाच असेल, तर २०१९ वर्षाअखेरीस चीनमध्ये एका वटवाघूळाच्या सूपमुळे काय झाले होते ते आठवा..! उगाच कोणीतरी पेंग्विनचे कच्चे मांस चाखायला जाईल (होय - काही लोक असेही करतात - का ते माहिती नाही) व त्या मांसातील एखादा विषाणू "म्यूटेट" होऊन पेंग्विन फ्ल्यू बनेल..! नवीन रोग नकोयत आता. दीड वर्ष घरी बसून काढलीत… परत नको ते दिवस…

नशीबाने मी "अजून तरी" असे काही ऐकले, वाचले किंवा पाहिले नाही की अगदी अलीकडे कोणी पेंग्विन खाल्ला आहे. आशा आहे की दक्षिण ध्रुवावर संशोधनासाठी जाणारे लोकही खात नसावेत… व पुढेही कोणी खाऊ नये हीच अपेक्षा.

सर्वात शेवटी मी एवढेच म्हणेन -
होय, मला पेंग्विन खूप आवडतो,व सर्वांना आवडावा... पण "ताटात" वाढलेला नव्हे,तर "थाटात" चालणारा..!

No comments:

Post a Comment