विदर्भात साप चावल्यावर पान लागलं असे का म्हणतात?
केवळ विदर्भातच नव्हे तर महाराष्ट्रातील बहुतांश ग्रामीण भागांत साप चावल्यावर 'पान लागलं' असा शब्दप्रयोग आजही केला जातो. 'पान लागणे' हा वाक्प्रचार बहुतेकांना समजणार नाही. परंतु ग्रामीण भागात तो आजही प्रचलित आहे.
नागाने किंवा सापाने दंश केल्यास 'सर्पदंश' झाला असं म्हटलं जातं. पण ग्रामीण भागांत आजही सापाचं नाव घेत नाहीत. एखाद्या व्यक्तीस साप चावल्यास 'साप चावला' असं न म्हणता 'पान लागलं' असं म्हटलं जातं.
पूर्वी लोक साप किंवा नागाचं नाव घेणं टाळत असत. त्याऐवजी गावाकडे 'जनावर' किंवा 'लांबडं' या नावाने उल्लेख करत असत.
संस्कृतमध्ये सापाला 'पन्नग' (पाय नसलेला) असे म्हणतात. या 'पन्नग'पासूनच 'पान' हा शब्द बोलीभाषेत रूढ झाला असावा.
तसेच मंत्राच्या साह्याने सापाचे विष उतरवितात त्याला 'पान उतरविणे' असाही सांकेतिक वाक्प्रचार रूढ आहे. कारण 'नाग' हा शिवाचे प्रतीक म्हणजे देव मानला गेला आहे. त्यामुळे सर्पदंश झालेल्या व्यक्तीत देवाचा संचार होतो, असे समजले जाते.
विदर्भात 'नागबारी' म्हणजे 'पान' उतरवणारा मंत्रतंत्रान्मक भजने म्हणणारा एक संप्रदाय आढळतो. हे लोक शिवाची आणि नागाची उपासना परंपरेने करत आले आहेत. त्यांना 'नागबारी लोक' असे म्हणतात. काही ठिकाणी त्यांना 'आरबाडी' असेही म्हटले जाते.
पान' लागलेल्या व्यक्तीस ते उतरविण्यासाठी मारुतीच्या पारावर नेण्यात येते. शेतात पान लागले असेल तर नदीची धार ओलांडून विषबाधित व्यक्तीला आणत नाहीत, तर तेथेच मांत्रिकाला नेण्यात येते. मंत्रोच्चाराच्या विधीमध्ये संबंधित व्यक्तीस खायला दिलेली कडुनिंबाची पाने कडू लागली किंवा मिरची तिखट लागली तर पान उतरले, असे समजतात. ते जर गोड लागले तर 'पान लागले' म्हणजे शरीरातील विष उतरले नाही, असे मानले जाते.
No comments:
Post a Comment