Thursday, 25 May 2023

'टाईम कॅप्सूल' ही संकल्पना काय आहे? भारतात अनेक महत्त्वाच्या ठिकाणी जमिनीखाली 'टाईम कॅप्सूल' ठेवण्यात आल्या आहेत, हे खरं आहे का?

'टाईम कॅप्सूल' ही संकल्पना काय आहे? भारतात अनेक महत्त्वाच्या ठिकाणी जमिनीखाली 'टाईम कॅप्सूल' ठेवण्यात आल्या आहेत, हे खरं आहे का?

हे खरे आहे की भारतात यापूर्वी जमिनीखाली काही ठिकाणी 'टाईम कॅप्सूल' ठेवण्यात आलेल्या आहेत. तसा टाईम कॅप्सूल या वस्तूचा मोठा इतिहास आहे. 2017 साली स्पेनमध्ये 400 वर्षे जुनी टाईम कॅप्सूल सापडली होती.

यामध्ये एका मुर्तीच्या आत ठेवलेल्या काही महत्वाच्या कागदपत्रांमध्ये वर्ष 1777 च्या कालखंडातील आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक घटनांबाबतची माहिती जतन केलेली होती. आतापर्यंतच्या इतिहासात सापडलेली ही सर्वात जुनी कॅप्सूल आहे.

काय आहे टाईम कॅप्सूल?

टाईम कॅप्सूलला मराठीत 'कालकुपी' असेही संबोधतात. टाईम कॅप्सूल हे कंटेनर सारखे असते. कॅप्सूलला बनवण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या तांब्याचा वापर केला जातो. लांबी जवळपास तीन फूट असते. या कॅप्सूलवर कोणत्याही प्रकारच्या हवामानाचा, पाण्याचा विपरीत परिणाम होत नाही.

टाईम कॅप्सूलमध्ये महत्वपूर्ण दस्तऐवज ठेवण्यात येतात. ही कॅप्सूल एकदा जमिनीत खोल गाडल्यावर ती हजारो वर्षांनी जमिनीतून बाहेर काढली तरी त्यामध्ये ठेवलेले दस्तऐवज सुरक्षित राहतात.

आगामी पिढीला गतकाळात काय घडलं होतं, याची माहिती व्हावी, हा टाईम कॅप्सूल जमिनीखाली ठेवण्यामागे मुख्य उद्देश असतो! म्हणजेच भविष्यात लोकांशी संवाद साधण्यासाठी ही कालकुपी वापरली जाते. त्यामुळे पुरातत्व शास्त्रज्ञ तसेच इतिहासाच्या संशोधकांना अभ्यास करणे सोईचे ठरते.

यापूर्वी सुद्धा देशात अशा प्रकारे टाईम कॅप्सूल काही महत्वाच्या ठिकाणी ठेवण्यात आली आहे.

  • सन 1973 मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हस्ते दिल्लीच्या लाल किल्ल्यात जमिनीच्या 32 फूट खाली टाईम कॅप्सूल ठेवण्यात आली होती. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या 25 वर्षांच्या घटना पुराव्यानिशी यामध्ये ठेवण्यात आल्या होत्या, असे म्हटले जाते. मोरारजी देसाई यांनी त्यांच्या कालावधीत ही टाईम कॅप्सूल काढून टाकली. त्यात कोणत्या नोंदी होत्या, याचे रहस्य आजही कायम आहे.
  • एवढेच नव्हे तर आयआयटी कानपूरच्या मागील 50 वर्षांच्या इतिहासाची माहिती असलेली 'कालकुपी' जमिनीखाली ठेवण्यात आली आहे. माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी सन 2010 मध्ये ही कॅप्सूल जमिनीखाली ठेवली होती. त्यामध्ये आयआयटी कानपूर ने केलेले संशोधन आणि तेथील शिक्षकांशी संबंधित असलेली माहिती ठेवण्यात आली होती.
  • याशिवाय चंद्रशेखर आझाद कृषी विद्यापीठाच्या इतिहासाची माहितीही टाईम कॅप्सूलमध्ये ठेवण्यात आली आहे.

'कालकुपी' अर्थात 'टाईम कॅप्सूल' वापरण्याची प्रथा प्राचीन काळापासून आहे. ही कॅप्सूल विशिष्ट पदार्थ वापरून तयार केली जात असल्यामुळे व ती जमिनीखाली सुरक्षित ठेवली जात असल्यामुळे भविष्यातील पिढ्यांना ऐतिहासिक संदर्भ असलेली महत्वाची माहिती मिळू शकते आणि गतकालीन इतिहास जाणून घेता येतो.

No comments:

Post a Comment