Thursday, 2 March 2023

घरच्या घरी नैसर्गिक रंग कसे तयार करावेत,यासाठी मुलांना काही टिप्स....!

घरच्या घरी नैसर्गिक रंग कसे तयार करावेत, यासाठीच्या काही टिप्स... 
पिवळा रंग  - 
घरगुती वापरातील हळदीचा वापर पिवळा कोरडा रंग म्हणून करता येईल.हळदीसमवेत बेसन पीठ किंवा मुलतानी मातीही वापरता येईल. मुळात हळदीमध्ये औषधी गुणधर्म असल्याने त्वचेसाठी फायदेशीर ठरू शकेल.झेंडूची फुले गरम पाण्यात किमान सात- आठ तास भिजवून ठेवावीत.त्यानंतर हे पाणी गाळून वापरावे.
हिरवा रंग - 
कोथिंबीर, पुदिना या पानांची पेस्ट करून हिरवा रंग तयार करता येईल.- पालक किंवा कडुलिंबाची पाने पाण्यात वाटून ते पाणी गाळून घ्या. कडुलिंब जंतूनाशक असल्याने त्याचा फायदा होईल.
लाल रंग- 
लाल जास्वंद,पांगारी अशा फुलांच्या पाकळ्या रात्रभर भिजवल्यास हा रंग तयार होईल.टोमॅटो आणि गाजराचा रस पाण्यात मिसळून ते पाणी वापरा.रक्तचंदनाची पावडर कोरडा लाल रंग म्हणून वापरता येईल.डाळिंबाची साल पाण्यात उकळून लाल रंग बनविता येतो.
काळा रंग-
 काळ्या द्राक्षांचा रस पाण्यात मिसळल्यास काळा रंग तयार होईल.
पांढरा रंग - 
मुलतानी मातीचा कोरडा पांढरा रंग म्हणून वापर करता येईल.

गुलाबी रंग- 
आपण बीट किसल्यानंतर हातावर दीर्घ काळ तो गुलाबी रंग टिकून राहतो.त्यामुळे अर्थातच हा गुलाबी रंग तयार करण्यासाठी बीटाचा वापर करता येईल.साधारण एक बीट किसून एक लीटर पाण्यामध्ये मिसळून ठेवायचे. गडद रंगासाठी बीटाचा किस रात्रभर पाण्यात ठेवता येईल. कोरड्या रंगासाठी बीट किसल्यानंतर ते पाण्यात मिसळायचे किंवा गव्हाच्या पीठामध्ये किंवा मैद्यामध्ये हा बीटाचा गुलाबी रस मिसळायचा.
केशरी रंग-
केशरी झेंडूच्या किंवा पांगिऱ्याच्या फुलापासून केशरी रंग तयार करता येऊ शकतो. ओला केशरी रंग तयार करण्यासाठी ही फुले रात्रभर पाण्यात भिजवून ठेवायची आणि त्यानंतर हे पाणी गाळून घ्यायचे. डाळिंबाची साल सात-आठ तास गरम पाण्यामध्ये ठेवल्यानंतरही केशरी रंग मिळू शकतो. पांगिऱ्याची फुले सावलीमध्ये सुकवल्यानंतर त्याची पावडर करून केशरी रंग तयार करता येऊ शकतो. बेलफळाचा गर पाण्यात टाकून उकळला की त्यापासूनही केशरी रंग तयार होतो.
निळा रंग-
निळ्या जास्वंदापासून किंवा नीलमोहोरापासून निळा रंग निर्माण करता येतो.ही फुले पाण्यात बुडवून त्यापासून ओला निळा रंग मिळेल. ही फुले सुकवून त्याची पावडर करूनही निळा रंग तयार करता येऊ शकतो.आपल्या आजूबाजूला विविध शोभेची फुले असतात.या फुलांच्या पाकळ्या सुकवून किंवा पाण्यात उकळवून त्यापासून आणखी काही रंग तयार करता येतात का, असा प्रयोगही करता येईल.


No comments:

Post a Comment