सर्वसाधारणपणे दात काढल्यानंतर रुग्णांचा रक्तस्राव 4 ते 5 मिनिटांत रक्त गोठण्याच्या प्रक्रियेमुळे थांबतो. मात्र, ज्यांना रक्तदाबाचा विकार आहे, ज्यांना अॅस्पिरिन, हिपॅरिन, वॉर्फेरिनसारखी औषधी सेवन करण्याची गरज आहे अशा रुग्णांच्या बाबतीत रक्तस्राव जास्त होण्याची शक्यता असते. त्यामुळे दात काढल्यानंतर रुग्णाने पुढील काळजी घेण्याची गरज आहे.
दात काढल्यानंतर त्या ठिकाणी ठेवलेला कापसाचा बोळा दीड तास दाबून ठेवावा. कापूस दाबून ठेवल्याने रक्त वाहण्याची क्रिया थांबून खपली धरण्याची क्रिया लवकर सुरू होते.
सर्वात मोठा प्रश्न येतो तो लाळेचा. इतक्या प्रमाणात लाळ सुटत असल्यास ती आपण वेळीच गिळली नाही तर तोंडाच्या कोप-यातून बाहेर गळायला लागते. रुग्णांच्या तोंडात कापूस ठेवलेला असल्याने खूप लाळ सुटायला लागते.
अशा वेळी लाळ गिळली नाही तर त्यात रक्ताचा एखाददुसरा थेंबही असतो. लाळेतून रक्त दिसताच रुग्ण घाबरतो. रक्तस्राव होत असल्याची भीती त्याच्या मनात वाटते.
तोंडात लाळ तशीच ठेवल्यास पेशंटला बोलता येत नाही. एकंदरीत गोंधळाची परिस्थिती निर्माण होते. असा पेचप्रसंग टाळण्यासाठी लाळ गिळलीच पाहिजे.
दात काढल्यानंतर बाहेर थुंकणे, चुळा भरणे, गुळण्या करणे, खाकरणे अशा क्रिया करणे टाळावे. रक्तावर धरलेली खपली नीट राहावी म्हणून लाळ गिळत राहणे, न थुंकणे महत्त्वाचे असते. रक्त गोठून जावे म्हणून बाहेरून गालाला बर्फ लावावा.
कापूस काढल्यानंतर आइस्क्रीम किंवा बर्फ घातलेले गार पेय आणि दूध प्यावे म्हणजे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. रक्त लवकर गोठण्यास मदत होते. जखमही आक्रसते, सूज येण्याचे प्रमाण कमी होते. मात्र, चुकूनही गरम वस्तूने शेकू नये, धूम्रपान करू नये.
यामुळे तोंडातील तापमान वाढते. रक्तवाहिन्या प्रसरण पावतात.
अधिक प्रमाणात रक्त वाहून जाण्याने सूज वाढते. दात काढल्यानंतर दोन-अडीच तासांनंतर हलका आहार घ्यायला हरकत नसते. फार गरम किंवा कडक पदार्थ खाऊ नयेत.
दात काढल्यानंतर दोन ते तीन दिवस नियमित औषध घ्यावे. दात काढल्यानंतर जखम भरण्यासाठी प्रतिजैविक आणि वेदनाशामक गोळ्या घेणे गरजेचे आहे. दात काढल्यानंतर डोळे अधू होतात हा गैरसमज आहे.
खराब हिरड्या व किडलेल्या दातामुळे सेप्टिक फोकस तयार होते. त्याचा संपूर्ण शरीरावर दुष्परिणाम होतो. सेप्टिक फोकस झालेला आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी नेत्ररोगतज्ज्ञ डोळ्याच्या शस्त्रक्रियेआधी दात तपासून घेण्याचा सल्ला देतात.
त्यामुळे किडलेले दात काढून घेणे योग्य पर्याय ठरतो. तो दंतआरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचाही आहे.
No comments:
Post a Comment