शिवाजी महाराजांचे आरमार----
शिवाजी महाराज १२-१३ वर्षांचे असताना म्हणजे १६४२-४३ मध्ये त्यांची रवानगी पुण्याला वडिलांच्या जहागिरीवर करण्यात आली.
पुण्यात आल्यावर त्यांनी मावळ व आसपासचा प्रदेश जिंकून घेतला.
आदिलशाहीच्या जहागिरीत राहून येथील किल्ले जिंकून सत्तेची पाळेमुळे रोवली.
राजगड,रोहिडा,तोरणा,कुवारगड,कोंढाणा इत्यादी किल्ले ताब्यात आणले.
इ.१६५५-५६ मध्ये जावळी सर केल्यावर रायगड किल्ला स्वराज्यात आला
आणि स्वराज्याची हद्द समुद्राला जाऊन भिडली,तेव्हा स्वराज्याचा संबंध सिद्दी,इंग्रज,पोर्तुगीज,डच,फेंच या सत्तांशी आला.
(आजचा मुंबईतील कुलाबा हा प्रदेश सिद्दीच्या अमलाखाली होता.)सिद्द्यांची राजधानी दंडराजपुरी येथील जंजिरा किल्ल्यावर होती.
किनारपट्टीवर धाडी घालणे,लुट करणे,जाळपोळ करणे,बायका पळवणे,लोक बाटवणे हा सिद्द्यांचा जुना होता.
या सगळ्याची दखल शिवाजी महाराजांनी घेतली होती.
पुढे १६५७ मध्ये महाराजांनी कल्याण,भिवंडी पावेतो प्रदेश काबीज केला,त्यामुळे सिद्द्यांशी संपर्क-संघर्ष होणे अपरिहार्य होते.
कृष्णाजी अनंत सभासद लिहितो, "पुढे राजीयास राजपुरीचे शिद्दी,घरात जैसा उंदीर तैसा शत्रू यास कैसे जेर करावे म्हणून तजवीज पडली.
" सिद्द्याचे पारिपत्य करण्याकरिता आरमार उभारण्याची निकड होती.
आरमार निर्मितीमुळे इंग्रज,डच,पोर्तुगीज,फ्रेंच या सत्तांना शह बसून सार्वभौमत्व सिद्ध होणार होते.
याच राजकीय कारणाकरिता महाराजांनी आरमार उभारले.
आज्ञापत्रात रामचंद्र पंत अमात्य म्हणतात, "आरमार म्हणजे स्वतंत्र एक राज्यागच आहे.
जैसे ज्यास अश्वबळ त्याची पृथ्वी प्रजा आहे.
तद्वतच ज्याचा आरमार त्याचा समुद्र.याकरिता आरमार अवस्यमेव करावे.
"महाराजांनी कल्याण,भिवंडी जिंकल्यावर कल्याणच्या खाडीत सुमुहुर्ताने आपल्या आरमाराची पहिली पठाणे तरती केली.
पोर्तुगीज दफ्तरातील आधाराप्रमाणे इ.१६५९ मध्ये मराठ्यांच्या आरमाराची मुहूर्तमेढ रोवली.
त्याचा तपशील असा,"आदिलशाहीचा सरदार शहाजीच्या मुलाने वसई व चौल कडील प्रदेश काबीज केला
असून तो बलिष्ठ झाला आहे.
त्याने काही लढाऊ गलबते कल्याण,भिवंडी,पनवेल या वसई तालुक्याच्या बंदरामध्ये बांधिली आहेत.
त्यामुळे आम्हांस सावध राहणे भाग झाले आहे.
ही गलबते समुद्रात फिरकू न द्यावी म्हणून (पोर्तुगीज)कॅप्टन ला आम्ही आज्ञा केली आहे
की,त्याने सदर गलबते बंदरातून बाहेर येउच देऊ नये.
" वसईस जहाज बांधणारे कुशल कारागीर होते.
रुय लैताव व्हीयेगस व त्याचा मुलगा फेर्नाव व्हीयेगस यांच्या नेतृत्वाखाली शिवाजी महाराजांनी वीस लढाऊ (Sanguicies) गलबते बांधण्यास सुरुवात केली.
ही जहाजे आपण सिद्द्याविरुद्ध लढण्यासाठी बंधित आहोत,असे शिवाजी राजांनी जाहीर केले होते.
कारण असे जाहीर केल्याशिवाय पोर्तुगीज त्या जहाजांना कल्याण-भिवंडीच्या खाडीतून बाहेर समुद्रात पडू देणे शक्य नव्हते.
सुमारे तीनशे चाळीसच्या वर कारागीर व इतर लोक जहाज बांधणीचे काम करत होते.
बायकामुलांसकट त्यांची संख्या बाराशेच्या वर होती.
शिवाजीचे आरमार तयार झाले तर सिद्द्याबरोबर आपल्यालाही(पोर्तुगीज) त्याचा त्रास होणार या भीतीने शिवाजीचे आरमार तयार होण्यापूर्वी (पोर्तुगीज लोकांनी) नोकरी सोडून द्यावी,म्हणून वसईचा कॅप्टन आन्तोनियु द मेलु कास्त्रु याने प्रयत्न केले.
परिणामी ही सगळी मंडळी शिवाजी महाराजांची नोकरी सोडून गुप्तपणे मुंबई व वसई येथे पळून गेली.
चौलच्या कॅप्टनने पोर्तुगीज गव्हर्नरास लिहिलेल्या पत्रानुसार चौल मध्ये राजे पन्नास तारवे बांधीत होते
त्यातील सात तारावे बाहेर पडण्याच्या तयारीत होती.
इ.१६६७ च्या शिवाजीच्या वाढत्या सामर्थ्याबद्दल विजरई कोंदी द सांव्हिसेन्ति याने एका पत्रात व्यक्त केलेले मत उल्लेखनीय आहे.
"शिवाजीचे नौदलही मला भीतीदायक वाटते.
कारण त्यांच्याविरुद्ध आम्ही सुरुवातीपासूनच कारवाई न केल्यामुळे त्यांनी किनाऱ्यावर किल्ले बांधिले
आणि आज त्यांच्याजवळ पुष्कळ तारवे आहेत;पण ही तारवे मोठी नाहीत.
"शिवाजीच्या आरमारात गुरबा, तरांडी, तारवे, गलबते, शिबाड, पगार या प्रकारची जहाजे असल्याची सभासद सांगतो.त्यात मचवे, बभोर, तिरकती पाल होते हा उल्लेख मल्हाररामराव चिटणीस करतो.
लढाऊ जहाजात गलबत, गुराबा व पाल ही प्रमुख होती.
गलबतांपेक्षा गुरबा मोठ्या प्रमाणावर असत आणि पाल सर्वात भारी असे.ही सर्व जहाजे उथळ बांधणीची म्हणजे लांबीच्या प्रमाणात अधिक रुंदीची असत.
नाळीकडील भाग खूपच निमुळता व उघडा असे,त्यामुळे त्यांना समुद्राचे पाणी कमी घर्षणाने कापता येई.
नाळीवर आलेले पाणी उघडेपणामुळे दोन्ही बाजूंनी वाहून जाई.
शिवकालीन नौकांचे प्रकार पाहूयात:-संदेशवाहक होडी:-हा होडीचा सर्वात लहान प्रकार असून तो व्हलवता येत असे.यावर डोलकाठी नसे.
क्वचितच एखादे शीड असे.
Water-boat:-
या होड्या पिण्याचे पाणी ने-आण करण्यासाठी वापरत असे.
मचवा:-हे एक छोटे जहाज असून ते व्हलवता येत असे.
त्यावर सुमारे २५-४० सैनिक असत.
हे जहाज त्वरेने हालचाल करत असे.
यावर शक्यतो तोफा नसत व केवळ छर्रे व ठासणीची बंदूक असणारी शिपायांची तुकडी असे.
शिबाड:
-हा मालवाहू जहाजाचा प्रकार आहे.
त्यावर तोफा बसवून ते युद्धासाठीही वापरत असत.
यावर एक डोलकाठी व शिड असून ते व्हलवता येत नसे ते केवळ वाऱ्याच्या आधारे एकाच दिशेने चालत.
गुराब:-
हे जहाज शिबडापेक्षा मोठे असून त्यावर २ किंवा ३ डोलकाठ्या असत व प्रत्येक डोलकाठीवर २ चौकोनी शिड असत.गुराबेवर जहाजाच्या लांबीशी काटकोनात प्रत्येक बाजूने ५-७ तसेच नाळेवर समोरून व पिछाडीस एक तोफ असे.
यावर सुमारे १००-१५० सैनिक असत.
तिरकती:-
हे तीन डोलकाठ्यांचे जहाज असे.
पगार:-
ही छोटी होडी असे.
जहाज बांधणीसाठी लागणारा चांगल्या प्रकारचा साग कोकणात विशेषतः वसईच्या आसपास मिळत असे.
शिवाजी राजांच्या आरमारी व्यवस्थेत २०० जहाजांचा एक सुभा केला जात असे.
मायनाक भंडारी व दौलतखान हे आरमाराचे प्रमुख अधिकारी होते.
तीन डोलकाठ्यांची जहाजे व्यापाराकरिता मस्कत पर्यंत जात असे.
आरमाराचे संरक्षण किनाऱ्यावरील किल्ले व खड्या यामुळे होत असे.
आरमारात कोळी, भंडारी, गाबित, भोई, खारवी, पालदी-मुसलमान व इतर यांचा भरणा असे.
आज्ञापत्रात आरमाराबद्दल आलेला उल्लेख असा "गुराबा थोर न बहुत लाहान यैशा मध्यम रीतीने सजाव्या तैशीच गलबत करावी.
थोर बरसे, फरगात जे वाऱ्याविणे प्रजोजनाचे नव्हेत यैसे करावयाचे प्रयोजनच नाही." आज्ञापत्रातील बाकीच्या गोष्टींचा उल्लेखही नोंद घेण्यासारखा आहे.
आरमार करावे त्यावरी मर्दाने मारक माणूस,भांडी,जम्बुरे,बंदुका,दारूगोळी,होके असावेत.
दर सुबेयास पाच गुरबा,पंधरा गलबते करून द्यावी.आरमारास तानखा सहसा मुलुखातून नेमून द्यावा.पैदास्तीवरी नेमणूक सहसा न करावी.
पैदास्तीचे नेमणुकीने सावकारास उपद्र होऊन सावकारी बुडते.
बंदरे राहिलो पाहिजेत.सावकारी वाढवावी.
आरमार सजीत सजीत सजावे.
आरमारकरी यांनी हमेशा दर्यात फिरून गनीम राखावा.
सर्वकाल दर्यावर्दी गनिमाचे खबरीत राहून गनिमाचे मुलुख मारावादर्यात कुली सावकारी तरांडी याची आमदारफत्ती करावी.
कौली सावकाराचे वाटी जाऊ नये.विदेशीची गैर कौली सावकारी तरांडी येता जाता आली तर त्यास सर्व साहित्य द्यावे.
अल्पस्वरूप जकात घेऊन त्यास जाऊ द्यावे.युद्धाच्या वेळी सगळ्यांनी एकत्र येऊन झुंजावे आणि गनिमाला बुडवावा.
गनीम दगाबाज असेल तर विश्वास न धरिता त्याचे जहाज फोडून टाकावे.
आरमारासाठी लागणारे सागाचे लाकूड हे अरण्यातून आणावे पण परवानगीने तोडावे असे महाराज म्हणत असत.
आंबे,फणस हे आरमाराच्या उपयोगी असल्याने त्याचे जतन करावे
ते वाढविण्यास कष्ट पडतात म्हणून ते त्याच्या मालकाकडून विकत घ्यावे
(यावरून राजे जनतेचा किती विचार करीत असे हे दिसते) त्यांना दु:ख होईल असे काहीही करू नये.यावरूनच राजांचे आरमाराबाबतचे धोरण स्पष्ट होते.
याच आरमाराने खांदेरीच्या मोहिमेच्या वेळी इंग्रजांची पाचावर धारण केली
जे इंग्रज सुरुवातीला ह्याच आरमाराला नावं ठेवीत होते
तेच इंग्रज १ नोव्हेंबर १६७९ च्या पत्रात लिहितात,"त्या लहान सरपटणारया होड्या आम्हाला आश्चर्यकारक रीतीने चकवतात.
आता आम्हाला असे वाटू लागले आहे की,आमच्याकडे तसल्या होड्या असतील तर आम्हालाही मदत होऊ शकेल.
" पत्रातील या उलेखावरूनच स्वराज्याच्या आरमाराची महती कळते.
संदर्भ:-शिवाजी महाराजांचे आरमार: भा.कृ.आपटे
सभासद बखर
चिटणीस बखर
आज्ञापत्र
इतिहासाच्या पाऊलखुणा-१
मराठ्यांच्या इतिहासाची साधने:पोर्तुगीज दफ्तर
No comments:
Post a Comment