भाषेचे माधुर्य.....
मराठी भाषा अप्रतिम सौंदर्याने नटलेली आहे... शब्दांच्या विविध छटा असलेल्या मराठी भाषेत एका शब्दाचे अनेक अर्थ होऊ शकतात... मराठी भाषा ही आपल्याला आपल्या पूर्वजाकडून प्राप्त झाली आहे. मराठी भाषा ही खऱ्या अर्थाने आपल्या महाराष्ट्राची ओळख आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. आपल्या महाराष्ट्राला मराठी साहित्याचा खूप मोठा इतिहास आहे याच मराठी भाषेने आपल्याला कुसुमाग्रज, बा.भ .बोरकर, शांता शेळके ,केशवसुत यासारखे अनेक कवी वि. स .खांडेकर, प्र .के. अत्रे यांच्यासारखे अनेक लेखक दिले. मराठी साहित्य खूप मोठे आहे त्याची ओळख करून घेणे व आजच्या पिढीला ओळख करून देणे गरजेचे होत चालले आहे.
माझा मराठीची बोलू कौतुके ,
परी अमृतातेही पैजासी जिंके |
असे म्हणत संत शिरोमणी ज्ञानेश्वरांनी मराठी वाङ्मयाचे समृद्ध दालन उघडले. मग ही ऐतिहासिक परंपरा सद्गुरू संत तुकारामापासून ते कविवर्य मंगेश पाडगावकरा पर्यंत..... अनेक दिग्गज साहित्यिक प्रतिभावंतांनी हा समग्र वारसा पुढे चालविला.... आपल्या अभिजात अजरामर मराठी साहित्य कलाकृतीने मराठी समाज मनावर गारुड केले. मराठी भाषेवर नितांत व निस्सीम प्रेम केले .मराठी भाषेची अभिरुची खऱ्या अर्थाने वैश्विक केली. मराठी ज्ञानभाषा ही मानवी जीवनाचा एक अविभाज्य घटक बनली. मराठी भाषेची वैविध्यता सर्वांगाने फुलते. भाषा ही दर बारा मैलावर बदलते असे म्हणतात. विविध रंग, ढंग ,वैशिष्ट्ये अशी मोहक रूपे घेऊन ती नदीसारखी प्रवाही राहते. प्रांतीय बोली भाषेचे माधुर्य आणि एकात्मता आपल्या या मायबोलीने कायम टिकवले आहे.
"ने मजसी ने परत मातृभूमीला
सागरा , प्राण तळमळला, सागरा! "
असे म्हणणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांचा हा देश आहे. परदेशी जाऊनही आपली मायबोली आणि आपल्या देशावर एवढे प्रेम करणारे लोक आपल्या याच महाराष्ट्राने आपल्याला दिले आहेत. म्हणूनच मराठी भाषेचा जागर करून तिचे संवर्धन करूया...
सौ- वैशाली रविंद्र डोंबाळे
No comments:
Post a Comment