सोलापुरात औद्योगिक वसाहतीमधील टॉवेल कारखान्यात शॉर्टसर्किटने
भीषण आगीचे तांडव ;मालक आणि कामगार कुटुंबातील ८ जणांचा होरपळून मृत्यू !
पहाटे साडेतीन वाजता आगीचा भडका !
सोलापुरातील अक्कलकोट रोड औद्योगिक वसाहतीमधील सेंट्रल टेक्सटाईल मिल टॉवेल कारखान्याला शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत मालक आणि कामगार कुटुंबातील एकूण ८ जणांचा मृत्यू झाला आहे.
रविवारी पहाटे साडेतीन वाजता आग लागल्यानंतर याची माहिती सुरक्षारक्षकाला समजल्यानंतर त्याने बाजूच्या कारखान्यातील सुरक्षा रक्षकाला सांगून अग्निशामक दलाला कळविले. तातडीने अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी आल्या.
कारखान्याच्या आतील भागात जाण्यासाठी अरुंद रस्ता असल्यामुळे मोठ्या अडचणी निर्माण झाल्या. तोपर्यंत आग मोठ्या प्रमाणावर भडकली होती. कारखान्याचे मालक उस्मान मन्सूरी व कुटुंबीय एक कामगार असे एकूण ८ जण या कारखान्यात काम करून तेथेच राहत होते.
मेहताब बागवान,त्यांची मुलगी हिना वसीम शेख आणि मुलगा सलमान मेहताब बागवान या तीन कामगार कुटुंबातील सदस्यांचे मृतदेह सकाळी बाहेर काढण्यात आले. तर कारखान्याचे मालक उस्मान मन्सूरी यांच्या कुटुंबातील चार व कामगार कुटुंबातील एक अशा ५ जणांचा शोध सुरूच होता.
मात्र दुपारी ओळखण्यापलीकडे झालेले कारखान्याचे मालक उस्मान मन्सूरी,त्यांचा नातू अनस ( वय २६ ),नात सून शिफा मन्सूरी ( वय २४ ) तसेच नातवाचा मुलगा युसूफ (वय १) व कामगार मेहताब बागवान यांची पत्नी आयेशा बागवान अशा ५ जणांचे मृतदेह मिळाले. सर्व मृतदेह शासकीय रुग्णालयात आणण्यात आले असून नातेवाईकांची प्रचंड गर्दी झाली आहे.
एमआयडीसीमध्ये असलेल्या कारखान्यामध्ये टॉवेलसह अन्य साहित्य तयार करण्यात येत होते. पहाटे साडेतीन वाजता आग लागल्यामुळे आगीवर लवकर नियंत्रण आणता आले नाही.
सोलापूर शहरासह अन्य ठिकाणाहून तसेच एनटीपीसीमधून सुद्धा आगीचे बंब मागविण्यात आले.
मोठ्या प्रमाणावर पाणी मारण्यात आले.परंतु आग धूमसतच होती. जवळपास पाच ते सहा तासानंतर आगीवर नियंत्रण आणण्यात यश आले.
मात्र आतून ओरडण्यात येत असलेला आवाज तोपर्यंत बंद झाला होता, अशी माहिती अग्निशामक दलाच्या जवानांनी दिली.
अग्निशामक दलाच्या काही जवानांना देखील भाजले आहे.
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
सकाळी आठ वाजता या ठिकाणाहून तीन प्रेत मिळाली होती, तर सायंकाळी आणखी पाच असे एकूण आठ प्रेत या ठिकाणाहून मिळाले उस्मान मन्सुरी परिवार या ठिकाणी राहत होता. ते आपला व आपल्या परिवाराचा जीव वाचवण्यासाठी वरच्या मजल्यावरील मागील बाजूस असलेल्या मास्टर बेडरूम मधील बाथरूम मध्ये बचाव करण्यासाठी थांबले होते.
पण त्या सर्वांचा त्या ठिकाणी होरपळून तसेच गुदमरून मृत्यू झाल्याचे समजते.
यावेळेस सांगताना बाबा मिस्त्री म्हणाले की महापालिका कर्मचारी लवकर न आल्याचे खंत त्यांनी व्यक्त केली. पोलीस प्रशासन व स्थानिक नागरिक यांचे यावेळेस मोलाचे सहकार्य होत होते.
उस्मान मन्सुरी हे खूप मनमिळावू तसेच सर्वांना मदत करणारे होते. आग का लागली? कशी लागली? याची उच्च चौकशी करावी.
या बचाव कार्यात महापालिका कर्मचारी सोलापूर अग्निशमन यंत्रणा एनटीपीसी टीम सर्व तालुका अग्निशमन यंत्रणा यावेळेस सहभागी होते.या महत्त्वाच्या बचाव कार्यात एस.एस.क्रेन सर्विस यांना अकरा वाजता निरोप मिळाला.
ते कोणताही विचार न करता पाच मिनिटात या ठिकाणी दाखल झाले. प्रत्येक जण आपल्या परीने मदत करताना दिसून येत होते. त्यासोबत पाहणाऱ्यांची गर्दी ही तितकीच होती. कंपनीतील कर्मचारी एका आशेने या सर्व घटना पाहत होते, की आपले मालक सुखरूप बाहेर यावेत.
सर्व कर्मचाऱ्यांची धडपड पाहून मन हेलावत होते. त्यांच्या परिवारातील एक सदस्य त्या ठिकाणी हजर झाल्यानंतर तो आत जाण्याचा प्रयत्न करत होता, पण सर्वांनी त्याला अडवले. यावेळी सर्वजण त्यांच्यासाठी प्रार्थना करत होते, हे सर्व वातावरण इतकं शांत होते की याचा आपण विचार पण करू शकणार नाही. पाण्याच्या गाड्या अग्निशमन यंत्रणा एकामागून एक येत होते.
त्यांचा जीव वाचवण्यासाठी धडपडणाऱ्या लोकांची पळापळ पाहून त्यांना पाण्याची व खाण्याची व्यवस्था करण्यात मग्न होते. कारण बचाव कार्यास किमान 12 तासाहून अधिक काळ झाला होता.
सर्वजण देवाची प्रार्थना करीत होते. सायंकाळी साडेपाच वाजता निरोप आला की आतील बेडरूम मधील बाथरूम मध्ये सर्वजण आहेत पण त्यांचा गुदमरून मृत्यू झाला आहे. हे ऐकून मनाला खूप चटके बसले.
त्या सर्वांना सरकारी दवाखान्यात सिविल या ठिकाणी घेऊन जाण्यात आले. यावेळेस सर्वांना अश्रू अनावर झाले. जर कंपनीत फायर सेफ्टी किंवा दुसरा दरवाजा असला असता तर सर्वांचे प्राण वाचले असते,असा सूर त्या ठिकाणी उमटत होता.
आज मन्सूर कुटुंबीयांवर जो दुःखाचा डोंगर कोसळला, यामध्ये संपूर्ण सोलापूर सहभागी आहे. देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो.
सोलापूरमध्ये अक्कलकोट मार्गावर टेक्सटाईल युनिटला लागलेल्या आगीत 8 जणांचा मृत्यू झाला आहे.
मृतांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधीतून 5 लाख रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येईल.
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
राहुल दत्तात्रय म्हमाणे
No comments:
Post a Comment