Monday, 31 October 2022

DCPS/NPS कर्मचाऱ्यांच्या जीवनात सोळाव वरीस धोक्याचं १ नोव्हेंबर काळा दिवस,

डीसिपीएस  कर्मचार्यांच्या जीवनात सोळाव वरीस धोक्याच.
1नोव्हेंबर काळा दिवस 
महाराष्ट्र राज्यातील सर्व DCPS/NPS धारक बंधू भगिनी आज 1 नोव्हेंबर हा दिवस कर्मचारी जीवनातील "काळा दिवस" म्हणून साजरा करत आहोत.
15 वर्षांपूर्वी 31ऑक्टोबर 2005 रोजी महाराष्ट्र शासनाने अध्यादेश काढत कर्मचाऱ्यांच्या आयुष्यात "न भूतो ना भविष्यति" असा सर्वात मोठा अन्याय केला आहे.
हा अन्याय म्हणजे कर्मचार्यांच्या उतारवायची काठी म्हणून आधार असलेली, संविधानाने जिला "मौलिक अधिकार"चा दर्जा दिला व सर्वोच्च न्यायालयाने ज्यावर कर्मचार्यांचा हक्क सांगत शासनाचे कर्मचार्यांप्रति शासनाचे उत्तरदायित्व वारंवार अधोरेखित केले आहे असे "निवृत्तीवेतन"(पेन्शन) बंद केले आहे.
हो हो बंदच केले आहे.ते कसे हे आता अगोदर आपण समजून घेणे आवश्यक आहे.आपल्या सर्वांना ज्ञात आहे महाराष्ट्रात 1 नोव्हेंबर 2005 पासून नियुक्त सर्व शासकीय कर्मचार्यांना म.ना.से निवृत्तीवेतन 1982 आणि म.ना.से. निवृत्तीवेतनाचे अंशराशिकरन 1984 हे 2 नियम 31 ऑक्टोबर 2005 च्या अधिसूचनेने केवळ सुधारणा या शब्दाचा वापर करून पूर्णतः बंद केले आहेत. यामुळे कर्मचाऱ्यांच्या हक्काचे निवृत्तीवेतन, कुटुंब निवृत्तीवेतन, सेवानिवृत्ती नंतरची किंवा मयतानंतरची ग्रॅज्युटी, कायमस्वरूपी अपंगत्व किंवा स्वेच्छानिवृत्ती नंतरचे निवृत्तीवेतन, जीपीएफ इ. सर्व लाभ पूर्णतः बंद करण्यात आले आहेत.
या निवृत्तीवेतन नियमांच्या बदल्यात सुधारणा म्हणून लागू केलेली परिभाषित अंशदायी योजना (DCPS) 1 नोव्हेंबर 2005 पासून नियुक्त कर्मचार्यांना निवृत्तीवेतन व तत्सम लाभ देईल असे सांगण्यात आले होते.
परंतु आपण मागील 15 वर्षाचा आढावा घेतला तर महाराष्ट्र सरकारने लागू केलेली DCPS योजना प्रत्यक्षात सेवानिवृत्त झालेल्या, मयत झालेल्या वा अपंगत्व किंवा स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या कर्मचाऱ्याना ना निवृत्तीवेतन देत आहे ना कुटुंब निवृत्तीवेतन, ग्रॅज्युटी आणि तत्सम इतर लाभ तर दूरच राहिले.
म्हणजे सरळ सरळ महाराष्ट्र सरकारने 1 नोव्हेंबर 2005 पासून नियुक्त सर्वच युवा कर्मचार्यांची निवृत्तीवेतन व तत्सम लाभ बंद केले आहेत.
ज्या क्षणाला कर्मचारी निवृत्त होत आहे, मयत होत आहे त्याच क्षणाला कर्मचारी आणि त्याच्या कुटुंबियांप्रति शासनाचा संबंध संपत आहे. हा एक प्रकारे राजरोष पणे गपगुमान दिला जाणारा एक प्रकारचा घटस्फोट/तलाक आहे.उभ्या हयातभर, ऐन तरुणपण शासकीय सेवक म्हणून निष्टेने सेवा देणारा माझा तरुण कर्मचाऱ्याचे घर त्याच्या अकाली निधनानंतर उघड्यावर येऊन उपासमारीचे जीवन जगत आहे.
महाराष्ट्रात असे हजारो कुटुंबे आपला आक्रोश करू करू थकली आहेत, तर त्यांची सध्याची अवस्था पहात चळवळ करणारा माझा कर्मचारी स्वतःच्या व स्वतः नंतर आपल्या कुटुंबाच्या भविष्याचा विचार करता करता चिंतेचे जीवन जगत आहे.
मित्रांनो मागील 15 वर्षे हा अन्याय आपण सहन करत आहोत. आपल्या सोबत नियुक्त झालेले हजारो मयत कर्मचारी कुटुंबियांचे हाल आपण पहात आहोत. भांडवलधार्जिणे, निगरगट्ट म्हणण्यापेक्षा काहीही धोरण नसलेले व विषयातील जाण आणि समज नसलेल्या राजकारणी व महाराष्ट्रातील सत्ताधारी राजकीय धुरीनानां आपण मागील 6 वर्षात अनेक प्रकारे विषय समजून सांगण्याचा वारंवार, पोटतिडकीने प्रामाणिक प्रयत्न केला आहेच. परंतु झोपेचे सोंग घेतलेल्या मंत्रालयीन बाबूंमुळे त्यांना त्याची समज येईना असेच दिसते आहे. हे सर्व करत असताना सर्व पक्षीय जाणत्या माणसांकडे जाण्याचा आपण प्रयत्न केला आहे परंतु समाजमन व समाजभान असलेला लोकनेता मात्र दुर्दवाने आपल्याला भेटला नाही. सध्या उभ्या महाराष्ट्रात असा लोकनेता नाहीच का?
 हा प्रश्न आपल्याला वारंवार पडला. तरीही आपण मात्र आपला विषय समजून घेईल अशा लोकनेत्याच्या शोधात कायम आहोत. कारण आपल्याला माहिती आहे आपला विषय योग्य व न्यायाचा आहे,समतेचा व समानतेचा आहे, भविष्यातील प्रशासकीय व्यवस्थाच नव्हे तर लोकशाही व्यवस्था वाचवणारा व सांधनारा आहे, उद्धवस्त होणारी कर्मचारी कुटुंबव्यवस्था व भारतीय संस्कृती जपणारा व वाढवणारा आहे, तो सुटणारा नव्हे तर सोडवावाच लागणारा आहे. नव्हे नव्हे आत्ता तर नियतीने अशी वेळ आणली आहे की, तो सोडविल्याशिवाय यांना आता गत्यंतर नाहीच.
 हि योग्य वेळ महाराष्ट्रात येणार याची आपल्याला मागील 4 वर्षांपासून खात्री होती आता मात्र आपण या सध्याच्या वेळेचे सोनं करणे आवश्यक आहे, ते ही प्रत्येक DCPS/NPS धारकाने वैयक्तिक समजून घेऊन, साथ देत..ती योग्य वेळ म्हणजे शिक्षक कर्मचाऱ्यांची फसलेली DCPS योजना केंद्राच्या नवीन NPS योजनेत समाविष्ट करणे.काहीजण असे ही म्हणतील की या अगोदर राज्य शासकीय कर्मचारी व जिल्हा परिषदेचे शिक्षक वगळून इतर कर्मचारी NPS मध्ये गेले नाहीत का? मग आत्ताच ही योग्य वेळ कशी काय? पण त्यांची संख्या, ते ज्या वेळी गेले त्यावेळी त्यांचा dcps योजनेचा कमी कालावधी व त्यांना लागू असलेल्या dcps ची अनियमितता व NPS बाबतची जागरूकता यामधील बाबी या कमी होत्या. त्या आणखी ही पूर्ण झालेल्या नाहीत. *शिक्षक संवर्गाला घेऊन आत्ता NPS खाते उघडण्यासाठी चा CSRF फॉर्म भरून देण्यापूर्वी चा आपण जो लढा लढतो आहोत त्यातुन आपण केवळ शिक्षक संवर्गाच्या DCPS लढा लढत नाही आहोत, तर NPS मध्ये अगोदर गेलेल्या कर्मचार्यांसाठीचा ही लढा तेवढ्याच ताकदीने आपोआप लढत आहोत. हे NPS मधील कर्मचार्यांनी आजच्या दिनी समजून घेणे आवश्यक आहे.
सोबत जोडलेले पत्र हे शिक्षक संवर्गासाठी चालू असलेली CSRF फॉर्म भरण्याची प्रक्रिया थांबविण्याविषयी स्पष्ट सांगत आहेत. हे आपल्या संघटनेचे यश आहे. मागील 4 महिन्यापासून आपण प्रशासन व कर्मचारी यांना हेच सांगत आहोत की,संघटनेने घेतलेले आक्षेप व मागण्यांची पूर्तता केल्याशिवाय महाराष्ट्रात शिक्षक संवर्ग NPS मध्ये जाऊच शकत नाही. यासाठी आपण 24 व 25 ऑगस्ट रोजी शिक्षण आयुक्त व शिक्षण संचालक यांना निवेदन देऊन चर्चा केली होती. सोबतच त्यावेळी प्रत्येक तालुका व जिल्हा प्रशासनाला निवेदने दिलेली होतीच. तरीही प्रशासनाकडे असलेला माहितीचा अभाव आणि त्यांच्यातील सुसंवाद व विसंगती यामुळे काही ठिकाणी CSRF फॉर्म भरून घेण्याविषयी आदेश, पत्रे निघाली व कार्यवाही ही करण्याची सक्ती करू लागले होते हे दुर्दव.म्हणूनच आपण 12 ऑक्टोबर रोजी दुसरे स्मरणपत्र देत या कार्यालयांशी पुन्हा चर्चा केली व त्याचे फळ म्हणजे आपल्या आक्षेप व मागण्यांविषयी कार्यवाही करे पर्यंत CSRF फॉर्म भरून घेऊ नये असे स्पष्ट आदेश वरिष्ठ प्रशासनाने काढले आहेत.
पण आपले त्याही वेळी व आत्ताही स्पष्ट मत आहे की, सरळ सरळ शिक्षक संवर्गाचा CSRF फॉर्म भरून घेण्यासाठीचा मागील 3 महिन्यात महाराष्ट्रात कोणताही आदेश अस्तित्वात नव्हता व आता ही नाही.आपण NPS मध्ये जाण्याअगोदर हा जो लढा घरबसल्या लढत आहोत, यातूनच आपल्याला योग्य तो न्याय मिळणार आहे. *यातून जे काही हाती लागणार आहे, ते प्रत्येक DCPS धारक व NPS मधील कर्मचार्यांच्या फायद्याचेच असणार आहे. नव्हे नव्हे यातूनच "जुनी पेन्शन" मागणीची सोनेरी पहाट सगळ्यात अगोदर उजाडली आहे.तेंव्हा आता प्रत्येक अन्यायधारी DCPS/NPS धारक युवा कर्मचाऱ्याने आजचा हा 16 वा "काळा दिन" साजरा करत असताना *एक खूणगाठ नक्की बांधायची आहे की यापुढे मी संघटनेच्या प्रत्येक लढ्यात हिरारीने सहभागी होईल, सामोहीक हितासोबत कायम राहील व माझ्या या एकीची वज्रमूठ कायम निनादत ठेवील.मित्रांनो सध्याचा हा लढा आपण घरबसल्या लढत आहोत, कदाचित यासाठीच पुढील दिवसात आपल्याला पुन्हा एकदा रस्त्यावर देखील उतरावे लागणार आहे नव्हे उतरुयातच... कारण सध्याच्या या लढयातूनच सर्वात अगोदर व तेवढ्याच लवकर आपल्या जुनी पेन्शन चा सूर्योदय आपल्याला दिसत आहे. फक्त गरज आहे ती साथीची.आजच्या अन्यायकारी अंधकारी दिनाचा निषेध करत भविष्यातील उज्ज्वल प्रकाशासाठी आपणास शुभेच्छा..
।।एकच मिशनजुनी पेन्शन
लेखक-शिवाजी खुडे
राज्य प्रवक्ते
महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना

No comments:

Post a Comment