नवऱ्याला आज पहिल्या झटक्यात त्याचे दोन्ही मोजे मिळाले, तर ते हातात घेऊन तो सकाळी घरभर नाचत फिरत होता.
चमत्कार! चमत्कार!! दोन्ही मोजे मिळाले मला एकत्र! तेही एका सेकंदात!
त्याला म्हटलं, मॅनेजमेंटच तशी आहे आमची!
यावर काहीही उत्तर न देता तोंड वेंगाडून तो आवरायला निघून गेला.
या मोज्यांनी जितका माझ्या जीवनात तहेलका माजवला ना, तेवढा आतापर्यंत कोणीही माजवला नसेल! #हल्लागुल्ला
ते मोजेच असतात, ज्यांच्यामुळे रोज सकाळी आमच्या शिस्तबद्ध कारभारावर गलथानपणाचा शिक्का मारला जातो.
नवऱ्याला कधीही दोन जोड सारखे मिळत नाहीत. त्याला मोज्यासाठी वेगळी बॅगही दिलीये तरी!
तुमची कामच नीट नाहीत, तुम्ही माझा कप्पा का हलवता?, त्याला हातच का लावता?, माझे मोजे तुम्ही मुद्दामच दुसरीकडे ठेवता पासून काय काय चालू होतं सकाळ सकाळी!
बरं धुतलेले सर्व कपडे घडी करून जागेवर ठेवायचं खातं मुलगी सांभाळते. तरी नवऱ्याला तुम्ही तुम्ही करून 'मला' सगळ्यात मध्ये टाकायचं असतं उगाच!
त्याला सांगितलं रात्री शोधून ठेवत जा, तर ते त्याला जमत नाही. सकाळी टाईमपास कसा होणार ना मग?
मुलगी शाळेत असताना तर तिच्या मोज्याचे कितीतरी जोड झालेले नुसते! का तर असलेला कधी वेळेवर मिळाला नाही म्हणून! ऐन शाळेत जाण्याच्या वेळेला एकच हातात मिळायचा अन् दुसरा मरमरून शोधत बसावं लागायचं! एकदा तर बाजूवाल्या मुलीचे सॉक्स मागून घालावे लागले. ती तिच्याच शाळेतली होती. आमच्याकडे सॉक्स होते पण सगळे वेगवेगळ्या आकाराचे एकेक! जोडी सापडत नव्हती! तिला असं विजोड नको होतं. #हल्लागुल्ला
त्यामुळे मुलाच्या वेळेला मी थोडी शहाणी झाले. त्याची तर सकाळची शाळा, मी रात्री सर्वात पहिले त्याचे मोजे शोधून ठेवते. ते एकदाचे दोन्ही मिळाले की मला सुटल्यासारखं वाटतं. चुकून ते शोधायचे राहिले अन् सकाळी धावपळ सुरू झाली तर मग पोरगा एका पायावर उभा राहून डिक्लेअर करायला मोकळा होतो, मी नाही शाळेत जाणार जाss
त्याला तर चान्सचं हवा असतो, हिचं काय राहतय अन् कधी मला 'मी नाही जाsss' करत अंग झाडायला मिळतंय!
मात्र आज तर या मोज्यांमुळेच सुरुवात छान झाली दिवसाची! शिवाय तो 'रोझ डे' का काय तो पण आहे ना! सालाबादप्रमाणे यंदाही आमच्याकडे तो कोणीही कोणाला गुलाबाचं फुल काय साधी पाकळीही देऊन साजरा करणार नाहीये.
सहज म्हणून आठवून पाहिलं, तर मला आतापर्यंत कोणीही गुलाब बिलाब दिलेला आठवत नाहीये. अन् त्यातल्या त्यात बरं म्हणजे मी ही कुणाला दिलेला आठवत नाहीये!
कोण आहेत बरं ही गुलाब देऊ घेऊ मंडळी? उत्साहमूर्तींनी न लाजता गुपितं फोडावी, गोपनियता जिवापलीकडे जपली जाईल काळजी नसावी😛
©️स्नेहल अखिला अन्वित
No comments:
Post a Comment