सेवेत कार्यरत असलेल्या शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा (TET) अनिवार्य करण्याच्या निर्णयाविरोधात दिल्लीतील जंतर-मंतर येथे लाक्षणिक उपोषणाला बसलेले पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाचे माजी आमदार दत्तात्रय अच्युतराव सावंत यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केल्याची माहिती डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेचे प्रदेश महासचिव सुनील चव्हाण यांनी दिली.
या कारवाईमुळे महाराष्ट्रासह देशभरातील शिक्षक वर्गातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. सेवेत असलेल्या शिक्षकांवर TETची अट लादल्यामुळे अनेक शिक्षकांवर अन्याय होत असल्याचा दावा शिक्षक संघटनांकडून करण्यात येत आहे. या निर्णयाविरोधात महाराष्ट्रातील शिक्षकांनी यापूर्वीही विविध स्तरांवर आवाज उठवला आहे.
प्रशासकीय पातळीवर सातत्याने पाठपुरावा करूनही ठोस तोडगा निघत नसल्याने माजी आमदार दत्तात्रय सावंत यांनी थेट दिल्ली गाठत आंदोलनाचा मार्ग स्वीकारला. मात्र, आंदोलनादरम्यान दिल्ली पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्याने शिक्षक संघटनांनी या कारवाईचा निषेध केला आहे.
“सेवेत असलेल्या शिक्षकां
वर TETची सक्ती करणे हा घोर अन्याय आहे. शासनाने देशभरातील सेवेत असलेल्या शिक्षकांना यातून तातडीने सूट द्यावी. अन्यथा यापुढील काळात दिल्लीत याहूनही तीव्र आंदोलन उभे केले जाईल.”
— दत्तात्रय सावंत, माजी शिक्षक आमदार
आंदोलनाच्या प्रमुख मागण्या
मुख्य मागणी : सेवेत कार्यरत असलेल्या शिक्षकांना TET परीक्षेच्या अटीतून संपूर्ण सूट देण्यात यावी.
सहभागी नेतृत्व : दत्तात्रय सावंत यांच्यासोबत आमदार किशोर दराडे, माजी आमदार बाळाराम पाटील आणि माजी आमदार श्रीकांत देशपांडे यांनीही आंदोलनात सक्रिय सहभाग घेतल्याचे सांगण्यात आले.
पूर्वीचा पाठपुरावा : दत्तात्रय सावंत यांनी जिल्हा स्तरापासून केंद्रीय शिक्षणमंत्र्यांपर्यंत या विषयावर पत्रव्यवहार आणि प्रशासकीय पाठपुरावा केला असल्याचे संघटनेने म्हटले आहे.
शिक्षकांच्या मागण्यांसाठी देशाच्या राजधानीत सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान झालेल्या कारवाईचा डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद, युवक शिक्षक कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना आणि अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटना अप्पाराव इटेकर, विनोद आगलावे, वल्लभ चौगुले, अब्दुल गफूर अरब यांनी जाहीर निषेध केला आहे.
सेवेत असलेल्या शिक्षकांना TETमधून सूट देण्याच्या मागणीवर शासन आता कोणती भूमिका घेते, याकडे महाराष्ट्रातील शिक्षकांचे लक्ष लागले आहे.
No comments:
Post a Comment