Monday, 18 August 2025

भगवंत मंदिर आणि बार्शी कश्यपि डॉक्टर...!

भगवंत मंदिर आणि बार्शी कश्यपि डॉक्टर...!

बार्शी शहर भगवंत मंदिरासाठी प्रसिध्द आहे.भगवंत मंदिर श्री विष्णुला समर्पित आहे. ह्या मंदिराचे वैशिष्ठ्य म्हणजे संपूर्ण भारतात श्री विष्णुला भगवंत या नावाने ओळखले जाते.  भगवंताचे बार्शी येथील भगवंत मंदिर हे भारतातील एकमेव मंदिर आहे. हे मंदिर ८५० वर्षांपूर्वी हेमाडपंथी शैलीत बांधलेले आहे. मंदिराला चार दिशांनी चार प्रवेश द्वार आहेत पण मुख्य प्रवेश द्वार हे पूर्वाभिमुख आहे. गर्भ गृहा समोर गरुड खांब आहे. श्री भगवंताची मूर्ती काळ्या पाषाणाची असून भगवंताच्या हातात शंख, चक्र व गदा आहेत. राजा अंबरीश ची मूर्ती भगवंताच्या उजव्या हातास आहे. श्री लक्ष्मी भगवंताच्या पाठीमागे आहे. भगवंताच्या कपाळा वर शिवलिंग असून छातीवर भृगू रीशीच्या पायाचे ठसे आहेत.
मंदिराची देख भाल पंच कमिटी मार्फत केली जाते. मंदिरातील भगवंताची पूजा व नित्य सेवा करण्याचा मान बार्शीतील फक्त बडवे कुटुंबातील व्यक्तींनाच आहे.  भगवंत मंदिरातील गाभार्यात फक्त बडवे कुटुंबातील व्यक्तीच प्रवेश करू शकतात. भारतातील अगदी खूप कमी मंदिरांपैकी बार्शीतील भगवंत मंदिर हे एक असे मंदिर आहे की जिथे देवाच्या मूर्तीला बडवे कुटुंबीय व्यतिरिक्त कोणीही स्पर्श करू शकत नाहीत.  माझा खूप जवळचा व जिवलग असा मित्र किशोर हरिभाऊ बडवे (सद्या राहणार पुणे) हा ह्या बडवे कुटुंबातील एक आहे. हे माझे भाग्यच आहे. 
भगवंत मंदिरात सकाळी काकड आरती, नित्य पूजा, महापूजा, संध्याकाळी धुपारती व रात्री शेजारती होत असते. आषाढी, कार्तिकी, चैत्री व माघी एकादशी च्या पंढरपूरच्या यात्रा महोत्सवा दरम्यान मोठ्या संख्येने भक्त गण भगवंताचे दर्शन घेतात. आषाढी व कार्तिकी एकादशीच्या वेळेस भगवंताची गरुडावर बसून नगर प्रदक्षिणा केली जाते. त्यावेळी भगवंताचा रथ मोठ्या दोरीने अनेक भक्तांकडून ओढला जातो. सदरचा रथ   ओढूण्याचं भाग्य मला लहानपणी अनेक वेळा मिळालेलं आहे. 
बार्शीच्या भगवंत मंदिराची अख्यायिका ही खूप रंजक आहे. 
बार्शीचा राजा अंबरीष हा एक तपस्वी राजा होता.  या अंबरीष राजाने अंगिरस ऋषींनी केलेल्या यज्ञात भाग घेऊन विद्वता आणि लोकप्रियता मिळवली होती. 12 वर्षे घोर तपस्या केल्याने त्याला भगवंताचे दिव्यज्ञान प्राप्त झाले. नारदमुनींच्या सांगण्यावरून त्याने साधनद्वादशीचं व्रत अंगिकारल. त्याच्या या कठोर साधनेमुळे इंद्राचे सिंहासन डळमळीत झाले. अशी आख्यायिका आहे. इंद्रदेवाने दुर्वास ऋषींना अंबरीषाची साधना भंग करण्यासाठी पाठवले. अतिथी सत्कारात दोष शोधून दुर्वास ऋषींनी अंबरीषाला जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्ती मिळणार नाही, असा शाप दिला. ऋषींनी क्रोधाने आपटलेल्या जटांमधून  एका दैत्याचा जन्म झाला. दैत्यापासून अंबरीषाचे रक्षण करण्यासाठी भगवंताने सुदर्शन चक्र सोडलं आणि दैत्याचा संहार झाला. ऋषींनी अंबरीषाची क्षमा मागितल्यावर सुदर्शन शांत झाले आणि हे सुदर्शन चक्र बार्शीतल्या उत्तरेश्वर मंदिरात विसावले, अशी एक अख्यायिका आहे.

दुसरी एक अशी आख्यायिका आहे की, पूर्वी बार्शी गावातून पुष्पावती नावाची एक नदी वाहत होती. एकदा दुर्वास ऋषींना पुष्पावती नदी ओलांडून दुसऱ्या ठिकाणी जायचे होते पण पुष्पावती नदीला प्रचंड पूर आल्याने नदीने उग्र रूप धारण केले होते त्यामुळे दुर्वास ऋषींना नदी ओलांडून जाणे शक्य होत नव्हते त्यामुळे रागाने दुर्वास ऋषींनी पुष्पावती नदीला शाप दिला की तू जमिनीवरून न वाहता उलटी म्हणजे जमिनीखालून वाहत जाशील. आणि बार्शी गाव लुप्त होईल. परंतु बार्शी चा राजा अंबरीष ह्याने भगवान विष्णूची पूजा करून, साक्षात भगवान विष्णूलाच बार्शी गावात येण्यास भाग पाडले व बार्शी गाव त्या शापातून मुक्त केले.
ज्या ठिकाणी भगवान विष्णू अवतरले तिथेच आज भगवंत मंदिर अस्तित्वात आले आहे. आणि त्याच मंदिरात भगवान विष्णूची मूर्ती आहे व त्या मूर्ती मध्येच भगवान विष्णूच्या चरणी अंबरीष राजा विराजमान आहे. आणि त्या शापाने आजही पुष्पावती नदी ही भगवंत मंदिराच्या पूर्वेकडे जमिनी खालून वाहत आहे. अशीही एक आख्यायिका आहे. देवाच्या अंगावर भक्ताची मूर्ती असलेलं एकमेव मंदिर म्हणजेच बार्शीतील भगवंत मंदिर आहे. 
भगवंतांनी घेतलेल्या दशावताराची शिल्पे मंदिराच्या शिखरावर कोरली आहेत. भक्तांच्या रक्षणासाठी पृथ्वीवर अवतरलेल्या भगवंताची मूर्ती गंडकी शिळेच्या गुळगुळीत काळ्या पाषाणाची आहे. गर्भगृहातील ही मूर्ती विलक्षण दिसते. हातात शंख, चक्र, गदा आणि उजव्या हाताखाली भक्त शिरोमणी अंबरीश राजाची मूर्ती आहे. देवाच्या अंगावर भक्ताची मूर्ती स्थापित असलेलं हे देशातलं एकमेव मंदिर आहे. देवाच्या पाठीशी लक्ष्मीची मूर्ती मुखवट्याच्या रूपात अस्तित्वात आहे. भगवंताच्या मस्तकावर शिवलिंग आहे. छातीवर भृगुऋषींच्या पावलांची खूण आहे. बार्शीचं भगवंत मंदिर पंढरीच्या पांडुरंगाच्या मंदिराशी साधर्म्य साधणारं आहे. केवळ मंदीराची रचनाच नव्हे तर अध्यात्मिक महत्वही पंढरीशी साधर्म्य साधणारं आहे. भक्त पुंडलिकाने जसा विठू भूलोकी आणला तसा राजा अंबरीषाने विष्णूला पृथ्वीतलावर यायला भाग पाडलं. पंढरीच्या मंदिरासारखंच सोळाखांबी मंदीर आणि गरुड खांब मंदीराचं अध्यात्मिक आणि प्राचीन महत्व अधोरेखित करतात. पंढरपूरला जाणारा वारकरी हा भगवंताचा निस्सीम भक्त आहे. एकादशीला पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन घेऊन द्वादशीला भगवंत दर्शनाने उपवास सोडायचा, अशी वारकऱ्यांची परंपरा आहे.

बार्शीतील भगवंत मंदिराची देखभाल ही पंचकमिटी तर्फे केली जाते. 
बार्शीतील सुप्रसिद्ध डॉक्टर कै. श्री दत्तात्रय गणपत कश्यपी हे ह्या पंचकमिटीचे अध्यक्ष असताना, ह्या मंदिराची खूप मोठ्या प्रमाणात सुधारणा करण्यात आली होती. कै. कश्यपी डॉक्टर हे एक उत्तुंग व निःस्वार्थी व्यक्तिमत्व होते. त्यांनी भगवंत मंदिराच्या सुधारणा कामासाठी बार्शीतील जनतेला मदतीचे आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनानुसार माझी आई विठाबाई बजरंग नलावडे हीने आमचे वडिल कै. बजरंग तात्याबा नलावडे यांच्या स्मरणार्थ रू. ५०.०००/- ची देणगी दिली होती. त्यावेळी ही रक्कम खूप मोठी होती.  त्यामुळे कै. कश्यपी डॉक्टर ह्यांनी माझ्या आईचे वैयक्तिकरित्या आभार तर मानलेच शिवाय भगवंत मंदिरातील नोटीस बोर्डवर नावासह आभार प्रदर्शन केले होते.  कै. डॉक्टर कश्यपी व त्यांच्या कमिटीने उत्स्फूर्तपणे केलेल्या कामामुळेच आज बार्शीतील भगवंत मंदिर हे आज एक सुस्थितीतील व स्वच्छ आणि शिस्तबद्ध असे एक मंदिर बनले आहे.
दिपक बजरंग नलावडे
 *RDM_SMS*

No comments:

Post a Comment