Wednesday, 24 August 2022

बऱ्याचदा रिकाम्या तासिकांना (Off Period) एखादी कृती (Activity) घेण्याचा मी प्रयत्न करतो. अशा तासांना मुलांच्या अभिव्यक्तीसाठी गटानुसार काही प्रश्न देतो◆ माणसाच्या पायाला चाके असती तर?◆ जगात फुले नसती तर?◆ आपली शाळा चंद्रावर भरत असती तर?◆ मला दहा कोटी रुपयांची लॉटरी लागली तर?अशा प्रकारच्या प्रश्नांपैकी दिलेल्या एका प्रश्नाची अधिकाधिक उत्तरे लिहून त्याचे सादरीकरण करणे, हे कृतीचे स्वरूप असते. उत्कृष्ट लेखन व सादरीकरणाला पेन, पेन्सिल किंवा लहानसे बक्षिसही दिले जाते. काही दिवसांपूर्वी सातवीच्या वर्गात असेच प्रश्न दिले असता, “मला दहा कोटी रुपयांची लॉटरी लागली तर?“ या प्रश्नाच्या उत्तरांमध्ये ‘गाडी घेईन, बंगला घेईन, फिरायला जाईन’ या सर्वसामान्य उत्तरांपेक्षा एका विद्यार्थ्याद्वारे वेगळी उत्तरे दृष्टीस पडली. दहा कोटी रुपयांची लॉटरी लागल्यानंतरही या विद्यार्थ्याने राशन भरणे, शाळेसाठी युनिफॉर्म घेणे, पेन-पेन्सिल घेणे आणि तुटकी चप्पल वापरणाऱ्या आईसाठी नवी चप्पल घेणे अशी वाक्ये लिहली. आपले प्रत्येक वाक्य वाचताना त्याच्या डोळ्यांतून अश्रू पडत होते आणि त्याला धीर देताना माझेही अश्रू त्यात मिसळले. या फोटोतही त्याच्या आसवांच्या खुणा आहेत. (विद्यार्थ्याच्या लेखनात किरकोळ चुका आहेत, त्यात सुधारणा करणे आपल्या हातात आहे. पण परिस्थितीचं काय?)- तुषार चंद्रकांत म्हात्रे, पिरकोन#तुषारकी

No comments:

Post a Comment